नारळ बर्फी

उद्या रक्षाबंधन, म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणुन प्रार्थना करतात.

नारळी पौर्णिमा म्हणजे नारळी भात, नारळाच्या वड्या …. नारळ बर्फी बनवून बघा, खात्री आहे तुम्हाला व तुमच्या लाडक्या भावलाहि नक्की आवडेल.

तुम्हा सर्वांना रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!

साहित्य

नारळ . . . . . . . १

साखर . . . . . साधारण ३०० ग्रॅम

तूप . . . . २चमचे

वेलचीपुड . . . . . . . . १ चमचा

बादाम-काजूचे काप . . सजावटीसाठी

केशर . . . . . . . . . . ४_५ काड्या

दूध . . . . . . . . . . . . १/२ वाटी

कृती

प्रथम केशर दूधात भिजवून ठेवावे .

नारळ खवून घ्यावे .

नारळाचा छान पांढरा चव घेणे ,पाठीचा काळपट भाग घेऊ नये .

कठईत तूप तापवून नारळाचा चव घालावा.

मंद आचेवर ५ मिनीटे परतावे.

केशर मिश्रीत दूध घालावे .

५ मिनीटानी साखर घालावी .

मंद आचेवर सतत ठवळावे .

हळूहळू साखर विरघळेल .

सतत ठवळत रहा .

थोड्याच वेळात मिश्रणाचा घट्ट गोळा होऊ लागेल .

मिश्रणाचा गोळा बनला व कठईचा काठ सोडू लागला , म्हणजे आपल्या बर्फीचे मिश्रण तयार झाले .

एका ट्रेला तुप लावून त्यात हे मिश्रण ओता .

वाटिच्या तळाशी तूप लावून त्याच्या सहाय्याने मिश्रण एकसमान ट्रेत पसरवा .

वरतून काजू – बदामाचे काप लावा.

आवडीनुसार वड्या पाडा.

Cutlet Urvashi Spl.

उर्वशी माझी छोटीशी, अवखळ, नटखट मुलगी
बाबांची अतिशय लाडकी.
लहान भाऊ सौरव त्याचा ताई वर भलताच जीव आहे , सतत तिच्या मागे लागणार, पळणार आणि भांडणार. तिने आई ग !! केलं की हाच कावराबावरा होणार.
माझी लहानशी परी, आई-आई दिवसभर करणारी ,अलगत मोठी होत गेली, इतकी मोठी की लग्नाच्या वयाची !

मन कातरल,मनात खूप कालवाकालव होत होती.
पण प्रत्येक गोष्टीची नक्की वेळ ठरलेलीच असते,नव्हे विधिलिखितच असते सर्व.
तिच्या साठी समोरून स्थळ आले काय आणि आम्ही १५ फेब्रुवारीला स्थळ बघितलं काय आणि पंधरा दिवसात लग्न ठरलं सुद्धा. रूपया-नारळ (सुपारी फुटली) ५ मार्चला आणि साखर पुडा २४ जूनला आणि लग्न ,२५ जूनला होते काय ! सगळंच झटपट. उर्वशीच्या स्वभावाप्रमाणे तिचं सर्व काम झटपट चालणार पटापटा , बोलणार टपाटपा, ओळखी होणार पटकन आणि त्यांच्याशी गप्पा मारणार झटकन, सर्वच फटाफट. वेळ घालू हा प्रकारच नाही तिच्याकडे.
माझी लाडकी लेक, सतत आई -आई करत मागे फिरणार, अख्खा दिवस गप्पा आणि गप्पा. गप्पांना विषयाचं बंधन नाही सर्व प्रकारच्या गप्पा राजकारण असो नातलगांचे विषय असो स्वयंपाकात विशेष गोडी, घराबद्दल चर्चा मैत्रिणीबद्दल काही ना काही सतत चालू.

आई म्हणून माझा जीव धास्तावला. हिला करमेल का सासरी आणि माझं मलाच हसू आलं. न करमन्या सारखं काय आहे,घरात भरपूर माणसं आहेत. अगदी आम्हाला महत्त्वाचे म्हणजे उर्वशीला आवडेल असच. माझी लाडकी लेक…….. त्यामुळे स्वयंपाक तर नाही सगळा पण कधी एखादी भाजी, नाश्त्याचा एखादा पदार्थ, कधी पोळी , कधी भाकरी , जे काही करणार त्याचं कौतुक अपार. बाबा पोटभर जेवणार, सौरव त्याचे फोटो काढणार, सगळे मिटक्या मारत खाणार. असं कोडकौतुकच माझं बाळ. खूप काळजी वाटायची.सासरी सगळं निभावेल ना ? कसं करेल ? कामाची तर सवयच नाही,जमेल ना हिला ?


गुरुवारी २५ जूनला लग्न झाले, परतावणी झाली परत सासरी गेली आणि दुसऱ्या गुरुवारी सकाळीच सात वाजता फोन आला, आई sss , गुड मॉर्निंग !! मला सांग कटलेट कसे करायचे, मी जरा अवाकच झाले,

काय sss! अगं माझ सगळं अवरलंय, ब्रेकफास्ट बनवायचा आहे तर कटलेट ची रेसिपी सांग ना !! दोन मिनिटं मला काय बोलावे सुचेना, आतून खूप भरून येत होतं माझी मुलगी गृहिणी झाली, अग आई काल पुलाव बनवला होता पण बराच उरलाय त्याचे कटलेट बनतील ना ?😀

Pulaoआणि तिने बनवलेल्या कटलेट चे फोटो ही आले .

ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करताना मला खूप खूप आनंद होतोय तिच्या सासरी सर्वांना खूपच आवडले, spl. सासुबाईंना त्यानी call करुन संगितले की उर्वशी ने खुप छान केलेत कटलेट, आणी मला परमानंद झाला, यापेक्षा अधिक काय हवे आईला.

खात्री आहे तुम्हालाही आवडतीलच, तुम्ही ही बनवा आणि प्रतिक्रिया अपेक्षित….
धन्यवाद


रेसिपी खालील प्रमाणे


साहित्य


भाज्या घालून केलेला पुलाव
फ्लॉवर
हिरव्या मिरच्या
मीठ
बटाटे
रवा
ब्रेड़ क्रम्ब्स

कृती

भात मिक्सर मधून जरासा फिरवून घ्यायचा ( म्हणजे कालचा भात आज परत खातोय, हे सांगितल्या शिवाय कोणाला कळातहि नाही)
एका पसरट भांड्यात घेऊन त्यात घरी असतील त्या भाज्या (कोबी, गाजर, फुलकोबी, बीट ) उर्वशी ने फ्लॉवर धुऊन किसून घातला होता.
दोन उकडलेले बटाटे mash करून घालायचे.
त्यात चवीनुसार मीठ, हिरव्या मिरच्या बारिक चिरुन वा वाटून घाला.

मिश्रण सैलसर वाटले तर जरा रवा घालुन मिक्स करुन दहा मिनिटे बाजुला ठेवून द्यावे, रवा फुलतो व मिश्रण आवळते.
पुन्हा हे सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत मिळवायचे आणि कटलेटचा आकार देऊन ब्रेडक्रम्स मधे घोळवून तव्यावर थोडं तेल घालून ब्राऊन रंगात shallow fry करायचे.


आणी मग काय गरम गरम मस्त sauce बरोबर स्वाहा करायचे.

तळटिप:
पानात वाढलंय तेवढं पूर्ण संपवायचं नाहीतर देवबाप्पा रागवेल’ असं म्हणून नेहेमी दम भरायचे आणि मग मुलं निमूट पानातलं सगळं नेमानं संपवायचे . एकतर चौरस आहार मिळावा म्हणून सगळे पदार्थ पोटात जाणे आवश्यक आणि दुसरे अन्न वाया जाऊ देऊ नये हा आपला उद्देश. Actually अन्न वाया घालवणे ना परवडणारे ना मनाला पटणारे. आता काही वेळेस अन्न उरतं. अश्या उरलेल्या अन्नाचा वाया न जाऊ देता योग्य सदूपयोग करून घेणे कौशल्याचे काम आहे. एवीतेवी हे प्रत्येक गृहिणीला अनुभवाने छान येत असतं. म्हणूनच आपल्या उरलेल्या अन्नाच्या छान रेसिपीज करतो.

मसूर पुलाव

वाढणी . . . . . . ४ जणांसाठी

वेळ . . . . . . . . ३०-४० मिनीटे

साहित्य

तांदूळ . . . . . . १ वाटी

मसूर . . . . . . . १ वाटी

लवंग . . . . . . . . ३-४

मिरे . . . . . . . . २

दालचिनी . . . . . १

वेलदोडे . . . . . . .२-३

बडीशेप . . . . . . . १ टे.स्पून

खसखस . . . . . . .१ टे.स्पून

लसूण पाकळ्या . . ५-६

आलं . . . . . . . . . . . १”

धनेपूड . . . . . . . . २ टि.स्पून

तेल . . . . . . . . . . . . २ टे.स्पून

कांदा . . . . . . . . . . . .१ मोठा

हळद . . . . . . . . . . . . १/२ टि.स्पून

लाल तिखट . . . . . . . २ टि.स्पून

मीठ . . . . . . . . . . . . . चवीनुसार

कृती

मसूर २-३ तास पाण्यात भिजवावेत . तांदूळ १५-२० मिनीटे भिजत घालावे .

पुलाव मसाला तयार करण्यासाठी लवंग ,मिरे , दालचिनी , वेलदोडे , बडीशेप , खसखस , लसूण , आलं , धनेपूड व काळी मिरी वाटून ठेवा .

कुकरमधे तेल तापवून जिरयाची फोडणी द्यावी .

उभा चिरलेला कांदा घालावा .

लालसर झाल्यावर कापलेला टोमॅटो घालून जरासे परतावे .

भिजवलेले मसूर निथळून घालावे , ५ मिनिटे चांगले परतावे .

आता वाटलेला पुलाव मसाला , हळद , लाल तिखट व प्रमाणात मीठ घालून परतावे .

तांदूळ निथळून घालावे .

जरासे परतून कापलेली कोथींबीर घालून एकत्र करावे . प्रमाणात पाणी घालून हलवावे , झाकण लावून कुकरच्या २ शिट्या काढाव्यात .

वाफ जिरल्यावर कुकरचे झाकण काढावे .

गरम पुलावावर तुप किंवा बटर घालून सर्व्ह करावे .

https://youtu.be/ey5dnBOPFzw

You may also like

https://youtu.be/9MIAQbfh_s8

https://youtu.be/cNi8rRWdi2A

https://www.youtube.com/playlist?list=PLWhQ4hgKi3Gbv-9hPPHCymCNJwlCp6Rc9

Fish fry

Fish fry is one of the easiest and quick recipe. Needs very basic ingredients and gets ready in jiffy. A perfect recipe for crisp lovers!

आमच्या गावाकडे खानदेशात हि वाम एकदम आवडती आहे. आमच्याकडे हिला “वाम” म्हणतात, हि वाम नदित व समुद्रातही सापडते. नदीतील वाम समुद्रातील वाम पेक्षा छोटी असते.

साहित्य

फ्रेश वाम १/२ किलो
कांदा १ लहान
सुके खोबरे १ छोटासा तुकडा
कोथिंबीर
बडिशेप १ टीस्पून
आले १ इंच
लसुण ५-६ पाकळ्या
हळद १ चमचा
लाल तिखट १-२ टीस्पून
धणे पावडर १ टीस्पून
हिंग १ टीस्पून
लिंबु १
मिठ चवीनुसार

कृती

मिक्सर मधे कांदा, खोबरे, कोथिंबीर, बडिशेप, धणे , आले व २-३ लसुण पाकळ्या टाकुन एकदम बारीक वाटुन घ्यावे.

वाम स्वच्छ धुवुन त्याचे तुकडे करुन घ्यावेत.

ह्या तुकड्यांना १/२ चमचा हळद, तिखट , मीठ व वाटण लावुन ठेवावा. किमान १/२ तास मुरू द्या .

कढई मधे किंवा तव्यावर तेल गरम करावे. त्यात २-३ लसुण पाकळया ठेचुन टाकाव्यात. हिरव्या मिरच्या थोड्या परतल्यावर त्यात मसाला लावुन ठेवलेले वामचे तुकडे ठेवावे .
तुकडे ५ मिनिटा नंतर उलटे करा आणि दुसरी बाजू सुद्धा फ्राय करून घ्या. गरज वाटल्यास थोडे तेल घाला. दोनही बाजू खरपूस भाजल्यावर जास्तीचे तेल टिशू पेपरनी टिपून घ्या आणि ग्रीन मिंट चटणी बरोबर सर्व्ह करा.

You may also try…Bombil Fry….

सुरमई फ्राय

पापलेट फ्राय


बोंबील फ्राय

कोवळ्या मेथीचे पिठलं

साहित्य

कोवळी मेथी

चणा डाळीचे पीठ १/२ वाटी

बारीक चिरलेली कोथिंबीर मूठभर

कांदा १

टोमेटो १

हिरव्या मिरच्या २-३

कढीपत्ता

मीठ चवीनुसार

१ चमचा जिरे

३ मोठे चमचे तेल

मोहोरी

हळद

हिंग

कृती

गॅसवर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग घालून फोडणी करावी त्यात कापलेला कांदा , टोमेटो, कढीपत्ता व धुवून चिरलेली मेथी घालावी .

४-५ मिनटे परतावं व त्यात हळद व जिरे घालावे .

बेसन पीठ घावावे , एक पेला किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालावं व लगेचच mix करावं, पिठाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत.

चवीनुसार मीठ घालावं .

व मंद आचेवर शिजू द्यावे.

वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा व ५ मिनिटे कढईवर झाकण ठेवावे.

गरम मेथीचे पिठलं भाकरी व हिरव्या मिरच्यांचा ठेचा अप्रतिम लागते.

काकडीचे थालीपीठ

थालीपीठ हा बहुदा प्रत्येक मराठी माणसाचा वीक पॉइंट असतो. कांद्याचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ, धपाटे असले वेगवेगळे प्रकार खाण्यासाठी अगदी आसुसलेले  असतो. गरम थालीपीठ आणि त्यावर मस्त घरच्या लोण्याचा गोळा यासरखे सुख नाही.

साहित्य

१/२ कप गव्हाचे पीठ
१/२ कप तांदुळाचे पीठ
१/४ कप बेसन
१/२ कप ज्वारीचे पीठ
१-२ मध्यम आकाराची काकडी खिसुन
२-४ हिरव्या मिरच्या
१-२ पाकळ्या लसुण
१ टेबल्स्पून जिरेपूरड
१ टेबलस्पून धणेपूड
मीठ – चविप्रमाणे
१/४ टीस्पून हळद

१/२ कप चिरलेली कोथिंबीर
तेल लागेल तसे
पाणी लागेल तसे

कृती

सगळी पीठे एकत्र करुन ओव्हनमधे ३५० डिग्रीवर ५-६ मिनिटे भाजावे. किंवा मध्यम आचेवर कढईत खमंग वास सुटेपर्यंत भाजावे.

दरम्यान मिरच्या, लसूण एकत्र वाटावे.

काकडी खिसुन घ्यावी. त्यात वाटण, मीठ, कोथिंबीर, हळद, जिरे-धणेपूड घालुन नीट मिसळुन ठेवावे. ५ मिनीटाने काकडीच्या मिश्रणला पाणी सुटले असेल. चमच्याने सारखे करुन ५-७ मिनीटे तसेच ठेवावे. काकडीला सुटलेल्या पाण्यात बरेचदा पीठ नीट भिजते. पण गरज लागली तर थोडे पाणी लावून पीठ थापता येण्याजोगे भिजवावे.

गॅसवर तवा तापत ठेवावा. पोळपाटावर ओले फडके/पंचा/रुमाल घालुन त्यावर एक मोठ्या लिंबाएवढा पीठाचा गोळा घेउन पाण्याच्या हाताने थालीपीठ थापावे. थापलेल्या थालिपीठाला मधोमध एक आणि त्याच्या कडेने २-३ भोके पाडावीत. यामुळे थालीपीठ नीट भाजले जाते.

आता फडक्यासहीत थालिपीठ उचलून तव्यावर उलटे टाकावे आणि हलक्या हाताने फडके सोडवून घ्यावे. पाडलेल्या छिद्रातून एकेक थेंब तेल तव्यावर सोडावे. गरज असेल तर कडेने ३-४ थेंब तेल सोडावे. एका बाजुने भाजुन झाले की उलटवून दुसरी बाजू देखील नीट भाजावी.

मस्त खमंग थालीपीठ काकडीच्या कोथिंबीरीबरोबर, लोणच्याबरोबर खावे.

 

बनाना चॉकलेट कपकेक

अनेकप्रसंगी घरी केळी शिल्लक राहतात आणि मग ह्या जास्त पिकलेल्या केळ्यांचे काय करावे हे समजत नाही. अशावेळी तुम्ही ‘बनाना चॉकलेट कपकेक’ तयार करू शकता, जे निश्चितच सर्वांना आवडतील.

बनाना अॅण्ड चॉकलेट कपकेक
तयार करण्यासाठी लागणारा वेळ १०-१२ मिनिट बेकींगसाठीचा कालावधी २० मिनिट

साधारण १८-२० कपकेक तयार होतात

साहित्य

जास्त पिकलेली केळी ३

वितळलेले बटर १/२ वाटी

पिठी साखर १/२ वाटी

व्हेनिला इसेन्स १ चमचा

मैदा २ कप

बेकिंग पावडर १/२ चमचा

अंडी २

दूध ४ चमचे

चॉकलेट चिप्स १/२ कप

कृती

ओव्हन २२० C तापमानाला प्रिहिट करावा. केळ्यांची साल काढून चांगले कुचकरून घ्यावे.

मिक्सिंगच्या भांड्यात वितळलेले बटर, साखर आणि व्हेनिला इसेन्स चांगले घोटून घ्यावे.

यात कुस्करलेल्या केळ्याचा गर घालून चांगले ढवळून एकत्र करावे.

एका भांड्यात अंडी फेटून त्यात हे केळ्याचे मिश्रण घालावे. नंतर दूध घालून चांगले ढवळावे.

आता मैदा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यात घालून चांगले एकत्र करावे आणि सर्वात शेवटी चॉकलेट चिप्स घालावेत.

तयार झालेले हे मिश्रण कपकेकच्या भांड्यांमध्ये दोनतृतियांश इतके भरावे.

ओव्हनमध्ये २० मिनिटांपर्यंत बेक करावे. कपकेकमध्ये टूथपिक घालून ते तयार झाले आहेत की नाही ते पडताळून पाहावे. जर का टूथपिकला केक न लागता ती बाहेर आली, तर कपकेक तयार झाले आहेत असे समजावे.

ओव्हनमधून बाहेर काढून जरा थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर थोड्यावेळाने सर्व्ह करावेत.

कोथिंबिरीचे पराठे

कोथिंबिरीचे पराठे

साहित्य

२ वाटया गव्हाचं पीठ

४-५ चमचे मैदा

कोथिंबिरीची मध्यम आकाराची जुडी

वाटीभर तेल

१ टेस्पून आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा

१ चमचाभर लिंबाचा रस

थोडंसं लाल तिखट

१/४ टिस्पून हळद

वाटीभर चणाडाळीचं खरपूस भाजलेलं पीठ

थोडीशी आमचूर पावडर

फोडणीसाठी जिरं आणि हिंग

लसणीच्या तीन ते चार पाकळया

चवीपुरतं मीठ

कृती

कोथिंबिरीची जुडी नीट निवडून, स्वच्छ धुवून, बारीक चिरावी.

कढईत अर्धी वाटी तेलावर जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करावी.

त्यात चमचाभर आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा घालावा, तसंच लसणीच्या पाकळ्याही ठेचून घालाव्यात. लाल तिखट घालावे .

नंतर कोथिंबीर घालून फोडणी परतून घ्यावी.

मग एक वाटी डाळीच्या पिठात अर्धी-पाऊण वाटी पाणी घालावं. पीठ पाण्यात व्यवस्थित कालवून, पिठाच्या गुठळ्या फोडून घ्याव्यात.

हे मिश्रण फोडणीला घातलेल्या कोथिंबिरीत ओतावं. चवीला मीठ, साखर, आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घालून कढईतील मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावं.

कढईतील मिश्रणाला एक वाफ येऊ द्यावी. ही कोथिंबिरीची भाजी गार झाल्यावर हाताला मऊ लागली पाहिजे, पण चिकट असता कामा नये.

भाजी थोडी झणझणीत झाली तर छान लागते .

भाजी तयार होईपर्यंत मधल्या वेळात कणकेत मैदा आणि किंचित मीठ घालून पराठयासाठी पीठ मळून घ्यावं. त्यात थोडं तेल ओतून झाकून ठेवावं.

साधारण १ तासानी कणकेचा तयार गोळा पुन्हा एकदा तेल-पाणी लावून मळून घ्यावा. तो चांगला सैल करावा.

कणकेच्या गोळयाच्या दुप्पट भाजीचा गोळा घेऊन त्याच उंडा तयार करावा. तो व्यवस्थित लाटून घ्यावा. लाटताना थोडा भाकरीसारखा थापून लाटावा. म्हणजे कडा फुटणार नाहीत.

आवडीप्रमाणे दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल सोडून पराठा खरपूस भाजावा.